व्यायामाचे महत्व

आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शरीर व मन कार्यक्षम असणे, आनंदी व उत्साही असणे. उत्साही मन आणि जोमदार शरीर या गोष्टींचा समावेश 'आरोग्य' या शब्दात अभिप्रेत आहे. "शरीर सुखी तर मन सुखी" या तत्वानुसार कोणतेही बौद्धिक काम यशस्वीरीत्या करण्यासाठी मनाची प्रसन्नता, सुदृढ - निरोगी शरीर आवश्यक आहे. शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
Health is Wealth असे नेहमी म्हणतात. पण Health is more than wealth, because wealth can change hands, health cannot.  म्हणून शरीररूपी संपत्ती राखण्यासाठी नियमित व्यायामाची नितांत गरज आहे. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नियमांनुसार सर्व अवयवांची शास्त्रशुद्ध हालचाल करण्याच्या क्रियेला 'व्यायाम' म्हणतात.व्यायामामुळे अवयवांची ताकद वाढते. विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळे अवयवांच्या प्रमाणबद्धतेला म्हणजेच सौष्ठवाला मदत होते. सुडौल बांधा म्हणजे सौष्ठव. 
व्यायाम हि सुखी, निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर- मनाचा निभाव लागावा, संकटांशी सामना करण्यासाठी शक्ती -जिद्द प्राप्त व्हावी यासाठी व्यायामाचा मंत्र जपायला हवा. अगदी रानटी अवस्थेपासून ते आजच्या आधुनिक जगात माणूस आधी स्वसंरक्षणाचा विचार करतो. त्यासाठी शारीरिक ताकद हवी. उत्तम आरोग्य लाभलेल्या माणसापासून सर्व संकटे दूर पळतात. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात - "शक्तीने पावती सुखे ... शक्ती नसता विटंबना... शक्तीने नेटका प्राणी ... वैभव भोगता दिसे.